संदेश भिसे
महाबळेश्वर – महाबळेश्वर येथील पर्यटनामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटीचा निधी महाबळेश्वर शहर सुशोभिकरणासाठी दिला आहे. त्यामुळे सध्या महाबळेश्वर तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र, ठेकेदारांच्या बेजबाबदार प्रवृत्तीमुळे विकासकामे सर्वत्र रेंगाळत असून ती निकृष्ट दर्जाची होत आहे. उन्हाळी हंगामाच्या आत महाबळेश्वरमधील ही विकासकामे पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महाबळेश्वर पाहण्यासाठी येणारे पर्यटक येथील क्षेत्र महाबळेश्वर, तापोळा, लॉडविक पॉईंट, प्रतापगड, वेण्णा लेक तसेच महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठेला मोठ्या संख्येने भेट देत असतात. सध्या याच भागात रस्त्यांची कामे सुरू असून बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. विकासकामे अगदी संथ गतीने चालल्याने व काही केल्या पूर्ण होत नसल्याने स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या उन्हाळी हंगामाच्या आत या रस्त्यांची कामे पूर्ण होतील का आणि न झाल्यास स्थानिकांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
आधीच मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगच्या समस्यांनी येथील नागरिक व येणारे पर्यटक त्रस्त आहेत. महाबळेश्वर येथील मस्जिद रोड, तापोळा रस्ता, क्षेत्र महाबळेश्वर रस्ता, लॉडविक पॉईंट रस्ता येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. उन्हाळी हंगामात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच सामना देखील करावा लागतो. यामुळे पर्यटक व व्यावसायिक त्रस्त होत असतात. यातच भर म्हणून येथील भागात चाललेली विकासकामे रेंगाळलेली असून अस्ताव्यस्त स्वरूपात आढळून येत आहेत. रेंगाळलेल्या कामांमुळे उन्हाळी हंगामात वाहतूक कोंडीमुळे चांगलीच तारांबळ उडणार आहे असे चित्र दिसत आहे.
वेळोवेळी येथील स्थानिकांनी रेंगाळलेल्या कामाबाबत कामाच्या दर्जाबाबत तसेच मुळात इको सेन्सिटिव्ह झोन हेरिटेज दर्जा प्राप्त असणाऱ्या महाबळेश्वर येथील विकासकामांमध्ये वापर होणाऱ्या फक्त आणि फक्त काँक्रिटीकरणाबाबत वारंवार तक्रारीसुद्धा केल्या आहेत. ठेकेदारास प्रशासनामार्फत सूचनाही केल्या. परंतु, कामात कोणत्याच प्रकारे सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.
काही दिवसांपूर्वीच महाबळेश्वर येथील सुशोभिकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदारास तत्काळ अर्धवट राहिलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावी यासाठी १६ मार्चपर्यंत मुदतही देण्यात आली होती व ठरलेल्या मुदतीत कामाचा दर्जा सुधारून कामे पूर्ण न केल्यास ठेकेदारास काळया यादी टाकण्यासंदर्भात येथील मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी नोटीस देखील काढली होती. परंतु, आजअखेर देखीलही काम पूर्ण करण्यात आलेली नाहीत. या ठेकेदाराच्या विरोधात प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठेकेदारांना प्रशासनाने ताकीद देऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातून होत आहे. एकंदरीत रस्त्याच्या कामाचा वेग पाहता ही कामे उन्हाळी हंगामाच्या आत पूर्ण होणार का, अशी परिस्थिती आहे.
ठेकेदारावर कारवाई होणार का ?
महाबळेश्वरच्या दृष्टीने उन्हाळी हंगाम मोठया प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण करणारा असून महाबळेश्वर येथील रस्त्याची सुशोभिकरणाची अर्धवट राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास येथील स्थानिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. महाबळेश्वर सुशोभिकरण करण्यास भरघोस निधी मिळाला असून गेल्या दोन वर्षांपासून महाबळेश्वर शहरातील सुशोभिकरणाची कामे अत्यंत रेंगाळलेली असून आजतागायात एकही काम पूर्ण नाही. वारंवार सूचना तक्रारी करून सुद्धा ठेकेदाराच्या कामात कोणतीच सुधारणा होत नसून संबधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा प्रश्न आहे.
– हेमंत साळवी (उद्योजक)