पुणे – भाजपची राज्याची नियोजन बैठक पुण्यात अॉक्स्फर्ड गोल्फ क्लब येथे रविवारी पार पडली. याला भाजपने निवडणुकीची तयारी आणि त्याचा आढावा बैठक म्हटले असले तरी जागा वाटपाबाबत यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. भाजपचे केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीतील चर्चेबाबत गुप्तता पाळली जात आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला गेल्याचेही समजते. या बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यासह प्रमुख ६० ते ७० पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच केली आहे; त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी आणि कामाचे वाटप करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आजची बैठक केवळ नियोजनाची – फडणवीस
ही नियोजनाची बैठक होती. पक्षाच्या अशा बैठका नेहमी होतात. निवडणुकीपूर्वी अशा बैठका घेतो. ज्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकारी यांची मते ऐकून घेतली जातात. तयारी काय केली पाहिजे. कोणत्या विषयांना महत्त्व दिले पाहिजे. विशेष संघटनात्मक चर्चा होते. राष्ट्रीय संघटन मंत्री आले होते. त्यांनी संघटनेचा आढावा घेतला. जागा वाटप अथवा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.