दिग्गजांचे मार्गदर्शन, सदस्यांचा गौरव, विविध कामांचे सादरीकरण
2023 मध्ये होणाऱ्या “जोश’ कॉन्फरन्सची घोषणा
पुणे – दिग्गजांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड, सदस्यांचा गौरव, विविध कामांचे सादरीकरण, सदस्यांचा मोठा प्रतिसाद, अशा उत्साही वातावरणात रोटरी क्लबची “उत्सव’ ही कॉन्फरन्स पार पडली. तर 2023 मध्ये होणाऱ्या “जोश’ या कॉन्फरन्सचीदेखील यावेळी घोषणा करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागच्या वतीने 7 आणि 8 मे रोजी “उत्सव’ या “डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स’चे आयोजन केले होते. यावेळी डी. जी. पंकज शाह, प्रिया शाह, आरआयपीआर शर्मिला भट्ट यांच्यासह लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भावना सोमय्या, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई, उद्योजक रुमा देवी, डॉ. आनंद देशपांडे आणि शेकडो रोटेरियन्स उपस्थित होते.
शनिवारी (7 मे) गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर आरसीपी सारसबागचे अध्यक्ष राजेंद्र साताळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिवसभरात मन की बात, नया दौर, पिक्चर अभी बाकी है, सबसे बडा रुपय्या, रोटरी वर्ल्ड वाईड आदी सत्रांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याचबरोबर महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी लष्करातील करिअरमधील विविध टप्पे उलगडले. यादरम्यान येणारी आव्हाने, संधीसह त्यांच्या आठवणी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. तर येत्या काळात विद्यापीठाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटक्या विमुक्त जातींसाठी सुरू केलेल्या कामाचा प्रवास, काम करताना आलेल्या संधी आणि तत्कालीन परिस्थिती मांडली. तर “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ संस्थेची माहिती सांगत भेट देण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक पद्मश्री भावना सोमय्या यांची मुलाखत आर.जे. संग्राम यांनी घेतली. यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधत चित्रपटाचे विश्व उलगडले.
तर रविवारी (8 मे) सकाळी “घुमर’ या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर दिवसभरात युवा, गुरू- सीएसआर, दिल चाहता है, रुक जाना नही आदी सत्रांचे आयोजन केले होते. यावेळी राजस्थानातील उद्योजक रुमा देवी यांची मुलाखत संगीता ललवाणी यांनी घेतली असून, यावेळी त्यांनी महिलांमधील कलेच्या मदतीने उभ्या राहिलेल्या व्यवसायाचे विविध पैलू उलगडले.
पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांची मुलाखत डॉ. दीपक शिकारपूर यांनी घेतली. या मुलाखतीदरम्यान दिग्गजांनी उद्योग विश्वातील विविध बाबी उपस्थितांसमोर मांडत, लघु उद्योगांवर भर देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. दिग्गजांच्या संवादाने उपस्थित सदस्यदेखील भारावले होते.
दरम्यान, क्लबच्या वतीने डी. जी. पंकज शाह आणि पत्नी प्रिया शाह यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे सदस्य, क्लब, सीएसआरअंतर्गत आर्थिक मदत करणाऱ्या दिग्गजांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रुमा देवी यांचा खास सल्ला
महिलांकडे असणाऱ्या कलेद्वारे त्या करिअर करू शकतात, असे रुमा देवी म्हणाल्या. यासह “उभे राहा, महिलांनी महिलांचा सन्मान करा. आपल्या हक्कांसाठी स्वत: लढा. आपल्यात काही ना काही कौशल्य नक्की आहे. त्याच्या सहाय्याने पुढे जा, स्वावलंबी बना, स्वत:वर विश्वास असल्यास उभे राहा आणि ठाम राहा’, असा विशेष संदेश रुमा देवी यांनी दिला. त्यांच्या संवादानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
पुढील कॉन्फरन्स लोणावळा येथे
लोणावळा येथे जानेवारी 2023 मध्ये “जोश’ या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. या कॉन्फरन्सची घोषणा यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे रोटेरियन्सने जल्लोषात नृत्याच्या साथीने ही घोषणा केली.
चित्रपट समीक्षक भावना सोमय्या यांना संग्राम यांनी चित्रपट सृष्टीच्या आकर्षणाने शहरांमध्ये येत असून, त्यांना कराव्या लागणाऱ्या “स्ट्रगल’बाबत प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना सोमय्या म्हणाल्या, “अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी दुर्गम भागातून आलेल्या अनेक नवोदितांना मी पूर्वी भेटले आहे. त्यांच्या पालकांना आपल्या मुलांना चित्रपटात काम करताना पाहण्याची आस असून, मुलांमध्ये ती स्वप्न असतात. मात्र, “स्ट्रगल’च्या या आठवड्यांचे दशकांत रूपांतर होते, पण अनेक मुलांना “ब्रेक’ मिळत नाही. त्यामुळे अनेकांना मी पूर्वी पुन्हा घरी जाण्याचे आवाहन करायचे. तुमच्या नशिबात “स्टार’ बनणे असेल तर संधी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल, अशी उदाहरणे यापूर्वी घडली आहेत.’