पुणे -बाजारपेठांना आता मॉल, ऑनलाइन व्यापार असे पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहकांना योग्यसेवा देणे हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. परंतु, पुणे बाजार समितीत प्रशासनाच्या आशिर्वादाने ठेकेदारांकडून वाहनचालकांची सर्रास लूट सुरू आहे. प्रवेशद्वारावर वाहनचालक आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची वारंवार भांडणे होत असताना संचालक मंडळ ठेकेदाराचे लाड पुरविण्यात व्यस्त आहेत. तर, संचालक मंडळाच्या अशा भुमिकेमुळे सचिव, विभागप्रमुखांनी यावर काही न बोललेलेच बरं, अशी भुमिका घेतली आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डात गुळ-भुसार विभागात भुखंड क्र. 412 ते 119 लोढा बिल्डींग मागील मोकळ्या जागेत वाहनतळ आहे. केवळ या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या वाहनांचे शुल्क आकारण्याचे आदेश बाजार समितीने ठेकेदाराला दिले आहेत. याव्यतिरिक्त बाजार समितीचे फळे व भाजीपाला विभागाच्या मुख्य गेटलगत वजन काट्यामागे वाहनतळ, गेट क्र. 4 येथील गुरांच्या बाजाराच्या मागे आणि पूर्वीच्या बांबू मार्केटच्या जागेत वाहनतळ आहे. या वाहनतळात पार्क केलेल्याच वाहनांना पार्किंग शुल्क आकारणे बंधनकारक असताना संचालक मंडळाच्या मर्जीतल्या ठेकेदाराने ताळतंत्र सोडला आहे.
गुळ-भुसार बाजारात कोठेही वाहन उभे केले तर त्याच्याकडून पार्किंग शुल्काच्या नावाखाली लुट सुरू आहे. गुळ भुसार बाजारात बहुतांश अन्नधान्याची वाहने ही परराज्यातून येतात. परराज्यातील वाहनचालकांना मराठी बोलता येत नाही. बाजारात येताना पैसे दिल्याचे सांगून देखील पार्किंगच्या नावाखाली बेकायदा पद्धतीने पैसे घेतले जातात, त्यामुळे वाहनचालक अक्षरश: वैतागले असून गेटच्या बाहेर वाहन पडताना ठेकेदाराचे कर्मचारी वाहनचालकांशी पैशांसाठी हुज्जत घालतात. नियमबाह्य पद्धतीने वसुली करणारा ठेकेदार संचालक मंडळाच्या खास मर्जीतील असल्याने त्याला पाठीशी घातले जात असल्याची चर्चा परिसरात आहे.
नियमाप्रमाणे पार्किंग शुल्क घेण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. बाजारात कोठेही उभ्या वाहनांकडून पार्किंग शुल्क घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तसेच याबाबत तक्रार आल्यावरच संबंधित ठेकेदारावर कारवाई करू, असे पुणे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर म्हणाले.
बाजार समितीत बाजारात परराज्यासह, शहरातील सर्वसामान्य वाहनचालक येत असतात. त्यांच्याकडून बाजारात प्रवेश करताना शुल्क, पार्किंग नसताना पार्किंग शुल्क घेतले जाते. त्यामुळे भविष्यात व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असे दी पूना मर्चंट्स चेंबरचे संचालक आणि माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले म्हणाले.