संतोष गव्हाणे
पुणे – पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा या मुख्य मार्गांवरून शहरात येण्यास अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत अवजड वाहनांना परवानगी असल्याने यावेळेपूर्वी आलेल्या अनेक अवजड वाहनांना मुख्यमार्गालगतच ठिय्या मांडावा लागत आहे. पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुणे शहरात अवजड वाहनांसाठी वाहनतळच नसल्याने विशेषत: व्यापारी पेठांतील माल घेऊन येणार्या वाहनांना शहराबाहेरच अडकून पडावे लागत आहे.
गेल्या 40 वर्षांपासून वाहतुकदारांकडून वाहनतळाची मागणी होत असताना राज्य शासनासह, महापालिका प्रशासनही याकडे दूर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे शहरातील सात भूखंडांवर अवजड वाहनतळ आरक्षण टाकण्यात आलेले आहे.
शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद असल्याने अशी वाहनांना शहरातील व्यापारी पेठा, बाजारपेठा अशा ठिकाणी यायचे असल्यास सकाळी अथवा दुपारी येणार्या वाहनांना शहराच्या वेशीवरच रस्त्यालगत वाहने थांबवावी लागत आहेत.
तसेच, शहरातील मार्केट यार्ड, मंडइ अशा ठिकाणांहून माल बाहेर घेऊन जायचा असल्यासही रात्री उशीर बाहेर पडावे लागत आहे. वाहतूक शाखेने अवजड वाहनांना शहरात बंदी घातल्याने वाहतूक कोंडीला आळा बसला आहे तसेच अपघातांचे प्रमाणही घटले आहे. मात्र, अवजड वाहने रात्रीच्या वेळी एकाच वेळी शिरकाव करीत असल्याने व्यापारी भागात रात्रीच्यावेळी गर्दी दिसून येत आहे.
व्यापारी पेठांत रात्रीची आवक-जावक
पुणे शहरात मार्केट यार्डसह मंडइ, टिंबर मार्केट, भवानीपेठेतील साखर मार्केट, लक्ष्मी रस्त्यावरील कापड मार्केट, रविवार पेठेतील विविध वस्तूंचे मार्केट यासह शहरातील इतर पेठांतही माल ने-आण करण्यासाठी अवजड वाहने येत असतात. परंतु, वेळेच्या बंधनामुळे अशी वाहने शहराबाहेरच अडकून पडत आहे. रात्रीच्या वेळी उशीराने माल येत असल्याने व्यापार्यांनाही आवक-जावक कामाच्या वेळा बदलल्या आहेत.
अवजड वाहनांसाठी वाहनतळ कधी….
शहरात मोठ्या संख्येने अवजड वाहने येत असतात. अशा वाहनांसाठी सुसज्ज आणि सर्व सुविधांयुक्त वाहनतळाच उभारणी करणे गरजेचे असताना याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील विविध वाहतुकदार तसेच महाराष्ट्र राज्य प्रवासी आणि माल वाहतूकदार संघटनेकडूनही अशा वाहनतळाची उभारणी करण्याबाबतची मागणी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून लावून धरली आहे.
मात्र, या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता केवळ शहरात येण्यास बंदी घालून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. याउलट पिंपरी-चिंचवडमध्ये अशा वाहनांसाठी आधुनिक वाहनतळ उभारण्यात आले आहे, यातून होणारी उलाढालही वाढली आहे. त्यामुळे पुणे शहरासाठीही असे वाहनतळ उभारणे गरजेचे ठरत असल्याचे महाराष्ट्र राज्य माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.