-देण्यात येणार अन्नधान्य आणि किराण्याचे किट
-चार ते पाच दिवसात होणार वाटप सुरू
-अधिकाधिक मदत करण्याचे सीनियर वकिलांना आवाहन
पुणे – जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनतर्फे पाच वर्षापेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या वकिलांना येत्या चार ते पाच दिवसात अन्नधान्य आणि किराणा असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. शहरात सहा ते सात विभाग करून, त्या त्या भागात राहणाऱ्या ज्युनिअर वकिलांना हे कीट देण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बारकडून हे वाटप करण्यात येणार आहे. अडीचशे गरजू जुनिअर वकिलांनी मदतीसाठी बारकडे संपर्क केला असून, आणखी शंभर ते दीडशे वकील मदतीसाठी संपर्क करतील, असा अंदाज पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी वर्तविला आहे. या
उपक्रमासाठी आत्तापर्यंत 35 वकिलांनी 3 लाख रुपयांची मदत बारला केली आहे. अधिकाधिक वकिलांनी आणखी मदत करावी, असे आवाहनही मुळीक यांनी यावेळी केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन पुकारला आहे. परिणामी, सर्व न्यायालय बंद आहेत. पाच वर्षापेक्षा कमी प्रॅक्टिस असलेल्या वकीलांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. सुरुवातीला ज्यनिअर वकिलांकडे फारशी कामे नसतात. त्यांना सीनियर वकील मदत करत असतात. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिलांना गुजराण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे बारकडून ही मदत करण्यात येत आहे.
उपाध्यक्ष योगेश तुपे, सचिन हिंगणेकर, सचिव घनश्याम दराडे, विकास बाबर, खजिनदार भाग्यश्री गूजर -मुळे, हिशेब तपासणीस ओंकार चव्हाण आणि बारच्या सर्व कार्यकारणीकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे. याविषयी अध्यक्ष मुळीक म्हणाले, ज्युनिअर वकिलांना सर्वतोपरी मदत देण्याची आमची भूमिका आहे. नुकतेच न्यायालयात काम करणाऱ्या 60 ते 70 शिपाई अणि सफाई कामगारांना अन्नधान्य आणि किराणा असलेले किटचे वाटत बारकडून करण्यात आले.