“अमेरिकेचे गांधी’ म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा मार्टिन ल्यूथर किंग यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी अमेरिकेतील अटलांटा येथे आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. अमेरिकेतील वंशभेदाबद्दल आवाज उठविणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने चालविल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे ते प्रभावित झाले होते. ते धर्मशास्त्राचेही विद्यार्थी होते म्हणून त्यांनी गांधींजीना “देवदूता’ची उपमा दिली होती.
त्यांनी 1959मध्ये भारत दौरा केला. वर्ष 1955 हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण होते. त्याच वर्षी त्यांचे कोरेट्टाशी लग्न झाले होते. वर्ष 1955 मध्ये डॉ. किंग यांनी अमेरिकेत निग्रो समुदायाला दाखविल्या जाणाऱ्या भेदभावाविरुद्ध यशस्वी अहिंसात्मक चळवळ चालविली. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण अलाबामा राज्यातील मॉंटगोमेरी सिटीमधील डेक्सटर बॅप्टिस्ट चर्चमध्ये बोलण्यासाठी त्यांना बोलवले गेले होते आणि त्याच वर्षी मॉन्टगोमेरीतील सार्वजनिक सिटी बसमध्ये एका गोऱ्या महिलेला बसण्याची जागा नाकारल्याबद्दल श्रीमती रोज पार्कस या निग्रो महिलेला अटक करण्यात आली व यास्तव तिच्यावर खटला भरण्यात आला होता. याविरुद्ध किंग यांनी आंदोलन छेडले. “मॉन्टगोमेरी बस बहिष्कार’ या नावाने ते आंदोलन प्रसिद्ध आहे. त्यांना आंदोलना दरम्यान अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला.
यावेळी खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किंग यांच्या घरावर बॉम्बहल्लाही झाला. 381 दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर अमेरिकन बसमध्ये प्रवाशांसाठी स्वतंत्र जागांची तरतूद रद्द करण्यात आली. नंतर धार्मिक नेत्यांच्या मदतीने त्यांनी अमेरिकेच्या उत्तर भागात त्याच समान नागरी कायद्याची चळवळ पसरविली. वर्ष 1964 मध्ये त्यांना जागतिक शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. अनेक अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी दिली. धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी त्यांना पदके दिली. “टाइम’ मासिकाने त्यांना 1963चे “मॅन ऑफ दी इयर’ असे नाव दिले.
म. गांधींच्या आदर्शांनुसार, डॉ.किंग यांनी अमेरिकेत अशी यशस्वी चळवळ सुरू केली, ज्याला बहुतेक युरोपियन लोकांचा पाठिंबा देखील प्राप्त झाला. “स्ट्राइड टुवार्ड फ्रीडम’ (1958) आणि “व्हाय वुई कान्ट वेट’ (1964) ही त्यांची दोन प्रसिद्ध पुस्तके आहेत. 1957 मध्ये त्यांनी दक्षिण ख्रिश्चन कॉन्फरन्सची स्थापना केली.
3 एप्रिल 1968 रोजी त्यांनी आपले अंतिम भाषण दिले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 एप्रिलला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व त्यात त्यांचे निधन झाले.किंग यांना मरणोत्तर प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम आणि कॉंग्रेसचे सुवर्णपदक देण्यात आले. तसेच मार्टिन ल्यूथर किंग जूनिअर दिनाची घोषणाही
करण्यात आली.
– माधव विद्वांस