गणेशोत्सवात जादा बसेसमुळे तब्बल कोटीचे उत्पन्न
पुणे – गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे एसटी विभागाकडून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. यातून एसटीला तब्बल एक कोटीचे उत्पन्न मिळाले. याद्वारे जवळपास 50 हजार जणांनी प्रवास केल्याचे प्रशासनाने सांगितले.
नोकरी, शिक्षणासह पुण्यात स्थायिक झालेले कोकणवासी गणेशोत्सवात आवर्जुन गावी जातात. त्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने पुणे-मुंबईसह अन्य भागांतून जादा बसेसचे नियोजन केले जाते. यंदाही पुणे विभागातून 264 बस मुंबई विभागात पाठविण्यात आल्या होत्या.
तर पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर येथून कोकणात जाणाऱ्यांसाठी 13 आगारांतून 168 जादा बसेसचे नियोजन नियोजन करण्यात आले होते. या 432 बसेसमधून पुणे विभागाला एक कोटी 3 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी एसटीकडून आगाऊ तिकीट बुकिंग करण्यात आले होते.
या ठिकाणी सोडण्यात आल्या जादा बस
गणेशोत्सवात दि. 16 ते 19 सप्टेंबर या चार दिवसांत जादा बस सोडण्याचे नियोजन पुणे एसटी विभागाकडून करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यातून चिपळूण, दापोली, देवरूख, गुहागर, खेड आणि रत्नागिरी या ठिकाणी स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड आगारांतून बस सोडण्यात आल्या होत्या.