पुणे -सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून न्यायालयीन सुनावणी, पर्यावरण प्रेमींचा विरोध तसेच इतर अनेक अडथळे पार करून प्रस्तावित केलेला बालभारती ते पौड फाटा रस्ता आता नव्याने वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
या रस्त्याचे काम सुरू होण्या आधीच या कामाचा खर्च तब्बल 16 कोटींनी वाढला असून या खर्चास महापालिकेच्या पथ विभागाने नव्याने अंदाज समितीची मान्यता घेतली आहे. त्यामुळे सुमारे 1.8 किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचा खर्च आता 236 कोटींवरून 252 कोटींवर गेला आहे.
हा रस्ता प्रस्तावित असतानाही, तो भविष्यात होईल या भरवशावर बांधकाम विभागाकडून या भागातील एका खासगी विकसकाच्या बांधकामास परवानगी देण्यात आली. मात्र, या विकसकाने रस्त्यासाठीची जागाच न सोडल्याने सुमारे 125 मीटरचा रस्त्याची जागा बदलावी लागली असल्याने हा खर्च वाढल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कामात मोठ्या प्रमाणात झोपड्या येत असल्याने या भागात हा रस्ता एलिव्हेटेड (उन्नत) केला जाणार आहे.
बालभारती ते पौड रस्ता या रस्त्यासाठी 236 कोटी रुपये खर्च पुणे महापालिकेने अपेक्षित धरला होता. मात्र, या ठिकाणी परवानगी देण्यात आलेल्या एका बांधकाम व्यावसायिकास परवानगी दिली आहे. तर त्यांचे बांधकामही झालेले आहे. त्यामुळे प्रस्तावित रस्त्याची जागा बदलावी लागली आहे. परिणामी, प्रकल्पाच्या खर्चाच्या आराखड्यात वाढ झाली असून त्यासाठी अंदाज समितीची मान्यता घेतली आहे. त्यानुसार,
पुढील आठवड्यात रस्त्याची निविदा काढली जाईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, मनपा