पुणे -महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकांच्या बैठकांना वेग आला असून, महापालिका आयुक्त विक्रम कुमार येत्या 15 मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्राथमिक तयारी करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुका लांबल्याने याच दिवशी महापालिका आयुक्तांच्या प्रशासकीय नियुक्तीस एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याच दिवशी हे अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता असून, प्रशासक म्हणून आयुक्तांचे हे दुसरे अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी महापालिका आयुक्त नवीन काही आणणार की जुन्याच योजनांच्या पूर्ततेवर भर दिला जाणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अंदाजपत्रकाचे काम जवळपास संपले असून, सोमवारपर्यंत ते अंतिम केले जाणार आहे.
मागील वर्षी 14 मार्च रोजी महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपली. त्यानंतर अद्यापही महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तच सलग दुसऱ्या वर्षी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांनी सात मार्च रोजी सादर केले. परिणामी, स्थायी समिती अस्तित्वात असतानाही केवळ कायद्यातील तरतुदीमुळे 15 मार्चच्या आधी स्थायी समिती अध्यक्षांना अंदाजपत्रक मांडता आले नाही. त्यामुळे आयुक्तांचेच अंदाजपत्रक अंतिम झाले. तर, आता ओबीसी आरक्षणाची सुनावणी सुरू असल्याने महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. परिणामी, 2023-24 चे अंदाजपत्रकही महापालिका आयुक्तच स्थायी समिती प्रमुख म्हणून आणि मुख्य सभेचे प्रमुख मांडणार असून, त्याला मान्यता देणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दुसऱ्या वर्षी सदस्य नसल्याने प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत.
नगरसेवकांच्या प्रस्तावांकडे लक्ष
महापालिका आयुक्त अंदाजपत्रक करणार असले तरी नगरसेवकांनी प्रभागातील कामांच्या याद्या आयुक्तांना देत निधी देण्याची मागणी केली आहे. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांकडून प्रस्तावित केली जाणारी वॉर्डस्तरीय तसेच स यादीतील कामे नसतात. त्यामुळे आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांचा निधी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामात नगरसेवकांनी प्रस्तावित केलेली कामे घेतली जाण्याची शक्यता आहे.