पुणे – भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या खूनाचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के बाफना- भळगट यांनी 15 हजाराचा जामीन मंजुर केला आहे. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे, महेश आगलावे, निखिल राजू मोहिते आणि राहुल दत्तू शेडगे अशी त्या पाच जणांची नावे आहेत.
बचाव पक्षातर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार आणि ऍड दिग्विजय ठोंबरे यांनी जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणी धीरज रामचंद्र घाटे (वय 46 , रा. स्नेहनगर, वृंदावन) यांनी फिर्याद दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी नवी पेठेतील सॅफ्रॉन हॉटेलमध्ये दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर याला आगामी पुणे महापालिका निवडणुकीत सहज निवडून येता यावे, यासाठी धीरज घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विकी, मनोज आणि महेश यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, तर निखिल आणि राहुल या दोघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हजेरी आणि विविध अटींवर हा निकाल दिला.