अहमदाबाद – विधानसभा निवडणुकांना अवघे एक वर्ष उरले असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आज राजीनामा दिला. विजय रुपाणी व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून भाजप आता पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर विजय रुपाणी यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “गुजरातच्या विकासाची घौडदौड यापुढे नव्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नव्या उत्साहासह व्हावी असं मला वाटत. याबाबतचा विचार करूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
“मला आनंद आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली.” असंही रुपाणी म्हणाले.
पंतप्रधानांचे आभार
“गुजरातच्या विकासाला एका नव्या उंचीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला मुख्यमंत्रीपदी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निरंतर मार्गदर्शन लाभले यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांनी मला ही संधी दिल्याबाबत मी त्यांचे आभार मानतो.” असं रुपाणी म्हणाले.
२०२२च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली
यावेळी रूपांनी यांनी, “भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. यापुढे माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती मी पार पाडेन. आम्ही ‘पद’ नाही ‘जबाबदारी’ म्हणतो. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील.” असे स्पष्ट केले.