पुणे – आदर्श आचारसंहितेची अतिशय पारदर्शक, प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणुकीवर प्रभाव पाडणाऱ्या बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येत असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १ हजार ८५४ मतदान केंद्रे असून, त्यात प्रामुख्याने मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्र आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने १ डिसेंबर २०२३ पासून आतार्यंत २ हजार ५०० पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीएअंतर्गत १३, मोक्का कायद्याअंतर्गत १८ संघटनांवर कारवाई करून ९९ आरोपींना अटक, तसेच ९५ आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले, की पुणे ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत शिरूर, बारामती मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून, ३ हजार १०२ मतदान केंद्रे आहेत. यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ असून, बारामती व शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मतदासंघात ५ संवदेनशील मतदान केंद्रे आहेत.
जानेवारीपासून २२ अवैध शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला असून, विविध गुन्ह्याअंतर्गत असलेल्या आरोपी, तसेच अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.