मंचर – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणार्या सेविकांच्या मागण्यांचा कोणताही विचार न करता लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असल्याने आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कामाहून काढण्याच्या नोटीसा पुणे जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन बळजबरीने दडपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास आक्रोश मोर्चा काढावा लागेल, असा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथे अस्मिता भवन इमारतीसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष निलेश दातखिळे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणार्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलन करून अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्याच्या दिलेल्या नोटिसांचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. याप्रसंगी शारदा शिंदे, झुंबर लोंढे, सुनिता घोलप, विजया थोरात अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. सोमवारपासून (दि. 8) आंदोलन सुरु आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असे आंदोलकांनी सांगितले.
आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, मंचर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रीतम बारभुवन व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलन करून अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्याच्या दिलेल्या नोटिसांचा यावेळी निषेध केला.
“अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वेतनात वाढ देण्यास तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युईटीची रक्कम, पेन्शन, दैनंदिन कामासाठी चांगल्या दर्जाचे मोबाईल, लाभार्थ्याच्या दरात वाढ, आहाराची थकीत रक्कम, या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी एक महिन्याहून अधिक काळ संप लोकशाही मार्गान सुरु आहे. कामावरून कमी करण्याच्या नोटीसा दिल्यामुळे सर्व अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. नोटिसांची होळी करून आक्रोश मोर्चा काढावा लागेल.” -निलेश दातखिळे, उपाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ