पुणे – महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यासाठी आणखी अवधी आहे. पण, नगरसेवकाच्या खुर्चीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांनी प्रचारासाठी महाशिवरात्रीचा “इव्हेंट’ साधल्याचे चित्र शहरात दिसून आले.
मंगळवारी शहरांतील विविध मंदिरांत महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आघाडीवर होता. शहरातील मध्यवस्तीपासून उपनगरांतील लहान-मोठ्या शिवमंदिर परिसरात या इच्छुक मंडळींनी मंडप उभारले होते. येथे भक्त मंडळींना साबुदाणा खिचडी, रताळींचा शिरा, काही ठिकाणी मसाला दूध, राजगिरा वड्या, गुडदाणी, खजूर लाडू अशा पदार्थांचे वाटप जोरदार करण्यात आले. तर, मंदिर परिसर मात्र होर्डिंग्जने झाकोळले गेल्याचेही दृश्य होते. दरम्यान, काही उपनगरांत महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला घरोघरी विविध पदार्थांचे वाटपही करण्यात आले. या सर्व माध्यमांतून या इच्छुकांनी मतांसाठी पेरणी करून ठेवली आहे, हे काही लपून राहिले नाही.
“काका, लक्ष असू द्या’
एरवी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांकडे कोणाचेही लक्ष नसते. पण, मंगळवारी मंदिर परिसरात अनेक इच्छुकांनी टेबल-खुर्ची मांडून अघोषित प्रचार केंद्र सुरू केले होते. येणाऱ्या प्रत्येक भाविकांना हात जोडून नमस्कार करताना हे इच्छुक दिसून आले. “काका, लक्ष असू द्या..,’ असा सूचक संदेश ते देताना दिसून आले. काही ठिकाणी नवी व्यक्ती दिसल्यास संपूर्ण माहिती घेत तो आपल्या मतदार संघातील आहे का याची चाचपणी केली जात होती.