पुणे- महापालिका निवडणुका जवळ येताच पक्षांतरासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेते मंडळींकडून विरोधी पक्षातील नेते आपल्या संपर्कात असल्याचे दावे-प्रतिदावे रंगू लागतात. खास करून विरोधी पक्षातील मोठा नेता हा आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षावर दबाव निर्माण करण्याचे तंत्र यातून अवलंबिले जात आहे.
2017ला मोदी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आयात झाले होते. सध्या महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असल्याने अनेक जण स्वगृही परतणार असल्याने मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याची चर्चा जोरात आहे.
महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत. तशी-तशी राजकीय पक्षातली चढाओढ देखील दिसत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नगरसेवक घेणे, आरोप-प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. भाजप-शिवसेना पक्षाची सत्ता असताना 2017च्या निवडणुकीसाठी 4ची प्रभाग रचना होती. 2022ला महाविकास आघाडीकडून 3 ची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यात पुण्याची 58 प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रभागांमधून 173 नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे आजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून आपल्याला कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळू शकते याची चाचपणी सुरू आहे.
पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप आरक्षण सोडत जाहीर झाली नसल्याने पर्यायी प्रभागांची तयारीही इच्छुकांकडून करण्यात येत आहे. वेळप्रसंगी विरोधी गटाचा झेंडा हाती घेत तिकीट पदरी पाडून घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट झाल्यानंतर एरव्ही विरोधकांच्या नावाने गळा काढणाऱ्यांच्या तोडून स्तुति सुमने ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.