पुणे – अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिष्ठित असलेल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ऍडजंट प्राध्यापक भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक असलेल्या प्राध्यापकपदाची भरती किती जागांसाठी होत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नेमक्या किती जागा भरल्या जाणार आहेत, हे निश्चित नसल्याने उमेदवारांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे.
सध्या अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांची पहिली पसंती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला असते. अशा प्रतिष्ठित विद्यापीठात अकरा महिन्याच्या कालावधीसाठी सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी रीतसर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी 10 जुलैपासून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 जुलैपर्यंत आहे.
यापूर्वी सीओईपीने ऑगस्ट 2021 मध्ये तात्पुरत्या कालावधीत प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यावेळी कोणत्या विभागात किती पदे भरले जाणार आहेत, त्याची सविस्तर माहिती दिली होती.
आता मात्र तसा कोणताच उल्लेख नसल्याने, त्यावर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. एखाद्या विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची नियुक्ती करताना किती जागा भरल्या जाणार आहेत, त्याचा उल्लेख असतो. हे सर्व नियम पायदळी तुडविले जात असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण विभागाकडे निवेदन दिले आहे.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात अकरा महिन्याच्या कालावधीसाठी सहायक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी ही भरती असल्याने त्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण होत नाही. किती जागा भरल्या जाणार आहेत, हे संबंधित विभागप्रमुख निश्चित करणार आहेत. नियमाला अनुसरूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे, असे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे म्हणाले.