बोगसगिरीच! अभियांत्रिकीचे तब्बल दीड लाख प्राध्यापक बोगस

पुणे – देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जवळपास दीड लाख प्राध्यापक बोगस असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) तपासणीतून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे, तर काही अभियांत्रिकी महाविद्यालयात अजूनही नियमबाह्य प्राध्यापक कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय “एआयसीटीई’ने घेतला आहे.

याबाबतची माहिती “एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयसोबतच फार्मसी, मॅनेजमेंट विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात येत नाही.

“एआयसीटीई’ने सलग तीन वर्षे कमी प्रवेश झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणली आहे. त्यामुळेच सुमारे 17 लाखांपर्यत वाढलेली प्रवेशक्षमता 14 लाख 50 हजारांपर्यत कमी करण्यात आली आहे. येत्या काळात ही प्रवेशक्षमता 14 लाखांपर्यत आणण्याचे नियोजन आहे. विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकांची संख्याही कमी केली आहे. तर, काही महाविद्यालयांत प्राध्यापकांना कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी “एआयसीटीई’ला प्राप्त होत आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थी, प्राध्यापकांची खोटी माहिती दिली होती. प्राध्यापकांच्या माहितीची पडताळणी केल्यावर सुमारे साडेसहा लाख प्राध्यापकांपैकी दीड लाख प्राध्यापक कागदोपत्री निघाल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यावेळी म्हणाले.

नव्या महाविद्यालयांवर नियंत्रणाची गरज
सध्या फार्मसी व मॅनेजमेंट विद्याशाखांच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांकडून संबंधित विद्याशाखांचे नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, नव्या महाविद्यालयांना मान्यता दिल्यावर काही वर्षांनी त्याची स्थितीही अभियांत्रिकी शिक्षणसारखे होऊ शकते. त्यामुळे नव्या महाविद्यालयांवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.