विश्रांतवाडी, दि. 23 (प्रतिनिधी) – चंद्रमानगर, येरवडा येथील मनोरुग्णालयाची जागा पुणे महापालिकेकडे वर्ग करण्याची कार्यवाही करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. त्यानंतर घरांची योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा असेही निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देखील सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चंद्रमानगर येथील रहिवाशांना हक्काचा निवारा मिळणार आहे.
या वेळी शैला चंदन गायकवाड, शितल राजेश कांबळे, मनोहर साळवी, हुरबानो शेख, रेहाना शेख, शालीनी साखरे, सुरेश धेंडे, हरीभाऊ काळे, प्रधान काळे, जहागिरधार आदीसह चंद्रमानगर येथील रहिवाशी उपस्थित होते. डॉ. धेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र. 2 मधील चंद्रमानगर, येरवडा येथील जागेवर गेल्या 40 वर्षांपासून 200 कुटुंबे राहत आहेत. या झोपडपट्टीधारकांना पुणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व पायाभूत सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. सदरील चंद्रमानगर झोपडपट्टी येथे महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्य सचिव यांनी भेट दिली होती. त्यांनी 2008 मध्ये केंद्र व राज्य सरकार, पुणे मनपा यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत 178 घरांचा सर्व्हे मंजूर केला आहे. या सर्व्हे प्रमाणे पुणे महानगरपालिकेने 178 घरांच्या कामाला मंजूरी दिलेली आहे. या पैकी 97 घरांचे काम चालू केले असून 77 घरांचे काम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी नागरीक रहावयास देखील गेलेले आहेत. तर उर्वरित 13 घरे अर्धवट अवस्थेत आहेत. तर काही घरे अजून बांधायची आहेत.
एका जनहित याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालयाने राज्यातील आरोग्यांच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिलेले आहेत. 2010 मध्ये या जनहित याचिकेवर पुणे मनपाने मा. उच्च न्यायालयामध्ये उर्वरित घरांचे बांधकाम करावयास तसेच राज्य शासनाकडे ही जमीन पुणे महापालिकेकडे वर्ग करण्यास पाठपुरावा केलेला आहे. त्यानंतर मनोरूग्णालय खात्याने अतिक्रमण झालेल्या नागरीकांचे सर्वे करण्यास सांगितले आहे. सदरील चंद्रमानगरमधील झोपडीधारकांची जागा पुणे महापालिकेकडे वर्ग करावे. या ठिकाणी घरबांधणी योजनेला मान्यता द्यावी, अशी मागणी या वेळी डॉ. धेंडे यांनी वेदनाद्वारे केली. या निवेदनावर सकारात्मक विचार करून कार्यवाही करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.