पुणे : सर्व व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची महापौर व महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : शहर आणि परिसरातील करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांप्रमाणे इतर सर्व व्यावसायिकांनादेखील घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात यावी. याबरोबरच व्यापाऱ्यांचा संपर्क थेट ग्राहकांबरोबर होत असल्याने त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून अगदी सुरुवातीपासून व्यापारी वर्ग करोनाला रोखण्यासाठी करोना योद्धाप्रमाणे काम करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद राहिल्याने व्यापारी वर्गाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असतानाही माणवावर आलेले करोनाचं संकट दूर करण्यासाठी व्यापारी वर्गाने सर्वोतोपरी मदत केली आहे.

आताचा पुणे शहरातील लॉकडाऊन घोषित केल्याप्रमाणे तो 14 मे पर्यंत आहे. परंतु, हा लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठवला तर त्याचे स्वागतच आहे. परंतु, न उठवल्यास येत्या 15 मे पासून जीवनावश्यक वस्तुंची सेवा देणाऱ्या दुकारनदारांप्रमाणे इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना देखील काही काळ दुकाने उघडण्यास आणि घरपोच वस्तुंची सेवा देण्यास परवानगी द्यावी. तसेच, व्यापाऱ्यांवर पोलिसांकडून होत असलेल्या चुकीच्या कारवाया थांबविण्यासाठी आपण पोलीस विभागाला आदेश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

व्यापारी हा अधिकाधिक नागरिकांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेत व्यापाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन लस देण्यात यावी. याबरोबरच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ नेहमीच प्रशासनाबरोबर राहून यंत्रणेला सहकार्य करीत सकारात्मक काम करीत आला आहे. आमची संघटना सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांची आहे. आपल्याद्वारे सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेस सहकार्य लागल्यास आम्हास अवश्य सांगावे. आम्ही आपणांस सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही निवेदनात म्हटल्याचे सचिन निवंगुणे यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.