पुणे- शहरात गेल्या काही वर्षांत अचानक अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नाल्यांना पूर येऊन जीवित तसेच वित्तहानीच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी, 2016 पासून महापालिकेने स्ट्रॉमवॉटर लाइन टाकण्याचे काम सुरू केले. पण, अतिक्रमणे, नाले-सफाई आणि गाळ काढण्याच्या कामात होत असलेला ढिसाळपणा, उपाय योजना कामांची संथगती यामुळे शहरात यंदाही अनेक भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
अशी जवळपास 30 ते 35 ठिकाणे असून या ठिकाणी महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रभागांतील नगरसेवकांच्या फुटकळ कामांसाठी दरवर्षी 600 ते 800 कोटींचा खर्च करणाऱ्या प्रशासनाला नाले दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसल्याचे चित्र आहे. या कामांच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याने काही अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्ट्रॉमवॉटर लाइन प्रकल्प तीन टप्प्यांत आणि तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. तर, सर्वेक्षणात नाल्यांवर 350 ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता होती. पहिल्या दोन टप्प्यांत जवळपास 300 ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात मागील वर्षी 35 ठिकाणांची कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी 40 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. यामध्ये कोथरूड स्मशानभूमी, किलबिल तसेच गंगा सॅलेलाइट येथील कल्वर्ट वाढवण्याचे काम आहे. यातील दोन कामे पूर्ण झाली आहेत, अशी कबुली प्रशासनानेच दिली आहे.
शिवाय 2019 मध्ये दक्षिण पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढा तसेच वडगाव ब्रुद्रुक परिसरातील नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे या नाल्यांवरील 21 कल्वर्टची उंची वाढविणे, नाले खोलीकरण, अतिक्रमणे काढणे, सीमाभिंत उभारणे अशी कामे केली जाणार होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ 11 ठिकाणची कामेच पूर्ण झाली आहे. परिणामी, यंदा जवळपास 40 ठिकाणी पूरस्थितीची शक्यता आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना 10 कोटींचा निधी
नाले सफाईसाठी प्रशासनाने 15 क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी अतिरिक्त 70 लाखांचा निधी दिला आहे. यातून नाल्यांतील गाळ, अतिक्रमणे काढणे तसेच इतर तातडीची कामे करावयाची आहेत. आता मान्सूनपूर्व पावसाच्या तोंडावर आलेला असतानाही अद्याप ही कामे झालेली नसल्याचे चित्र आहे.