सातारा – पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक गावात विकासकामे होत असून हा निधी वेळेत खर्च होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. यावेळी ठराव समिती सभेत विषयपत्रिकेवरील 13 आणि ऐनवेळचे पाच असे 18 विषय एकमताने मंजूर झाले.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा प्रशासक विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.
या कामांची अंदाजपत्रके तयार करुन तात्काळ प्रशासकीय मान्यता देवून गतीने आणि दर्जेदार कामे होण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायत स्तरावर निधी खर्च करण्याबाबत जिल्हा आणि तालुकास्तरावर नियोजन करावे, असेही गौडा यांनी सांगितले. कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद सेसमधून 2022- 23 अंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी 35 लाख रुपयांचे अनुदान खर्चाच्या योजनेस या सभेत मान्यता देण्यात आली. माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी ई निविदा प्रसिध्द करण्यात आली होती.
यामध्ये चार मक्तेदारांनी सहभाग नोंदवला होता. तांत्रिक तपासणीमध्ये एक मक्तेदार अपात्र ठरला असून सर्वात कमी अंदाजपकीय दराची मे. एम. एस. कन्स्ट्रक्शन पुणे यांची निविदा मंजूर करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत
पशु जंत निर्मुलन मोहीम- शिबिरे नाविन्यपूर्ण योजना राबवण्यास या सभेत प्रशासकीय व खर्चास मान्यता देण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील 13 आणि ऐनवेळच्या 5 अशा अठरा विषयांना मंजुरी देण्यात आली. शासनाचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांचा विनय गौडा व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.