सर्वच दुकानांत गर्दी ; काही ठिकाणी नियमांचा फज्जा
पुणे – अनलॉकच्या नियमावलीनुसार शहरातील सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल सोमवारपासून (दि.9) दुपारी चार वाजेपर्यंत सुरू झाली. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी केल्याची दिसून आली. तर, उर्वरित प्रकारची दुकाने आता सुरूच राहणार असल्याने नागरिक तुरळक प्रमाणात खरेदीसाठी आल्याचे दिसून येत होते.
हॉटेल सुरू झाली, तरीही चालकांना अजून ग्राहकांची प्रतीक्षा आहे. कमी प्रमाणात ग्राहक हॉटेलात आल्याचे दिसून आले. दोन महिन्यानंतर उघडलेल्या सलूनच्या मात्र दुकानात काही प्रमाणात गर्दी दिसली.
करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. तिसऱ्या टप्प्यातील नियमानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही दुकानांना यापूर्वीच उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, हॉटेल, सलून, जिम सोमवारपासून उघडण्यात आली.
कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चप्पल खरेदी करताना नागरिक दिसून आले. तर, किराणा आणि इतर दुकानांत तुरळक गर्दी होती. हॉटेलांना पूर्वी पार्सल देण्यास परवानगी होती. त्यानंतर आता निम्म्या क्षमतेने हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सकाळी 7 ते दुपार 4 पर्यंतच हॉटेल सुरू ठेवता येणार आहेत. या कालावधीत अपेक्षित व्यवसाय होणे कठीण आहे. मात्र, हॉटेलचा व्यवसाय मुख्यत्वे सायंकाळी आणि रात्री होत असतो. त्यामुळे हॉटेल उघडी ठेवण्यास आणखी वेळ वाढवून दिला पाहिजे. करोनाच्या सर्व नियमांचे पालन करू.
– अनिल घुले, मालक, एमपीज घुले गार्डन आणि रेस्टॉरंट.फ
नियमांचे काही ठिकाणी पालन..
करोनाच्या नियमांचे अनेक ठिकाणी पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले. मास्क परिधान करून दुकानात प्रवेश करणाऱ्यांना सॅनिटायझर देण्यात येत होते. मात्र, काही ठिकाणी गर्दी झाली होती. तिथे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. टपरी, हातगाडी अशा ठिकाणी नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आले.