64 वर्षीय महिलेला बाधा; आरोग्य यंत्रणा सतर्क
पुणे – येरवडा परिसरातील एका 64 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले. संबंधित महिला केरळला फिरण्यासाठी गेली होती, त्याठिकाणी तिला बाधा झाल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.
पुण्यासह राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महापालिकेसह राज्यातील सर्व जिल्ह्यात झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला दि. 5 नोव्हेंबरला ताप आल्यामुळे तिच्या रक्ताचा नमुना दि. 10 नोव्हेंबरला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एन आय व्ही) पाठविण्यात आला.
11 नोव्हेंबला तिचा अहवाल “झिका पॉझिटीव्ह’ आला. दि. 15 ऑक्टोबरला महिला केरळ येथे गेली होती. आता तिची तब्येत स्थिर असून, कुटुंबातील 5 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत, असे डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी सांगितले.
कसा आहे हा व्हायरस…
झिका व्हायरस हा एडिस डासांमुळे पसरणारा व्हायरस आहे. दिवसा सक्रिय असलेल्या संक्रमित एडिस डासांच्या चाव्याद्वारे हा प्रामुख्याने लोकांमध्ये पसरतो. युगांडातील झिका जंगलाच्या नावावरून या व्हायरसचे नाव देण्यात आले आहे. झिका व्हायरसची सुरुवातीची लक्षणं सौम्य असू शकतात. पण, शरीरात व्हायरसचे प्रमाण वाढले की, ही लक्षणे गंभीर होऊ शकतात. अनेकांना संसर्ग झाल्यानंतर आठवडाभरानंतर या आजाराचे निदान होते. एडिस डासांची पैदास पाण्यात होते.
व्हायरसची लक्षणे अशी…
खाज सुटणे, त्वचेवर पुरळ, ताप, सर्दी, घाम येणे, स्नायू वेदना, डोकेदुखी, थकवा, भूक कमी लागणे.
सुरक्षिततेचे उपाय…
* मच्छरदानीचा वापर करावा.
* साचवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका
* खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावा.
* स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ज्यूस, नारळ पाणी घ्यावे