वाघोली : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या कुटुंबीयांनी भावडी तालुका हवेली येथील दगड खाण पट्ट्यात शेती फुलवण्याचा आधुनिक प्रयोग करून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श उभा केला आहे.
वाघोली परिसरातील भावडी खाण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात खाण क्रेशर चे उद्योग असून त्यातून करोडो रुपयांचे महसूली उत्पन्न जिल्ह्याला मिळत आहे. उत्खननाची मर्यादा संपल्यानंतर याच रिकाम्या पडलेल्या खाण पट्ट्यात वाघोली येथील भैरवनाथ तलावाच्या खोली करणातून निघालेली काळी माती व पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांच्या गृह प्रकल्पाच्या उत्खननातील काळी माती आणून ती दगड खाण पट्ट्यात टाकून रामभाऊ दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाच एकर शेती फुलवली आहे. याच खानपट्ट्यातील साठलेल्या पाण्यावर ही शेती फुलवली जात असल्याने राज्यातील खाण पट्ट्यात पर्यावरण संवर्धनाचा हा अनोखा आदर्श सध्या चर्चेला येऊ लागला आहे.
बारा महिने पाण्याची उपलब्धता आणि उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर यामुळे ठराविक क्षमतेच्या उत्खननानंतर ओस पडलेल्या दगड खाणीमध्ये हे शेतीचे प्रयोग वरदान ठरू लागले आहे. दाभाडे यांच्या या प्रयोगानंतर याच परिसरात अनेक जण अशाच पद्धतीने शेतीचे प्रयोग करू लागल्याने एकेकाळी ओळख बनलेला हा दगड खाण पट्टा आता शेतीने फुलला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दाभाडे यांनी याच ठिकाणी शेतीबरोबर पशुपालनाचा उपक्रम राबवला असून यात २५ गीर गाई यांच्या माध्यमातून दाभाडे यांना पूरक व्यवसायातून मोठी मदत होऊ लागली आहे.
दगड खाण पट्ट्यात राज्य शासनाकडून पडणाऱ्या आरक्षणांनंतर या खाणींचा वापर कचरा किंवा अन्य टाकाऊ पदार्थांच्या वापरण्यासाठी करण्याऐवजी शेतीसाठी देखील होऊ शकतो हा यातून वेगळा संदेश जात असून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श राज्यासाठी अनमोल संदेश देत आहे. धुळीच्या साम्राज्याची ओळख असलेल्या हाच खाण पट्टा आता हिरवाईने नटलेला पाहावयास मिळू लागल्याने नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
दगड खाण पट्ट्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करून तसेच काळी माती टाकून उभी राहिलेली शेती खाण क्षेत्रातील चित्र बदलून टाकत असून अनेक खाण जागा मालकांनी या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केल्याने मोठा आनंद होत आहे.
रामभाऊ दाभाडे माजी जिल्हा परिषद सदस्य