पुणे – पुणे शहरात 2022 मध्ये झालेल्या अपघातात रात्री 11 ते 1 दरम्यानच्या काळात सार्वधिक जीवघेणे रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे पोलीस आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या व्हायटल स्टॅटेजीज’च्या तांत्रिक सहयोगाने वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना दुष्परिणामांबद्दल इशारा देणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
21 नोव्हेंबरपासून चार आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिनेमागृहात 30 सेकंदांची एक चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. या उपक्रमात आपला मुलगा गमावलेल्या पालकांची सत्यकथा कथित करण्यात येणार आहे. पुण्यातील नागरिक संजय नारकर यांनी आपला 24 वर्षांचा मुलगा रस्ते अपघातात गमावला आहे. याची सत्यकथा या चित्रफितीतून दाखवण्यात आली असून नारकर वेगाने वाहन चालविण्याचे परिणाम आणि आणि घरातील सदस्याच्या मृत्यूचे परिणाम सांगणार आहेत.
शहरात 2022 मध्ये अपघातात एकूण 327 जणांचा मृत्यू झाला. यात 75 मृत्यू हे रात्री 11 ते 1 च्या दरम्यान झालेल्या अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असतांना अजाणतेपणाने वाहनांचा वेग वाढतो आणि त्यामुळे अपघात होत असल्याचे पुणे पोलिसांच्या 2022 च्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून समोर आले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी असते, यामुळे तरुण मुले आपली दुचाकी वेगाने दामटतात. मात्र रस्त्यावरील खडी, खड्डे, रस्ता दुभाजक आणि पोल यांचा अंदाज न आल्याने अनेकजण अपघातात मृत्यू पडतात.
“गेल्या काही वर्षात रस्त्यावरील वाहनांचा वेग हा प्राणघातक आणि गंभीर दुखापतींसाठी कारण ठरत आहे. रस्ते अपघातात आलेला अचानक मृत्यू हे कुटुंबाला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अपंग करत असतात.” – रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
“रिकामे रस्ते असतात तेव्हा वाहनांचा वेग वाढतो आणि अपघात होतात. यामुळे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांचा वेग कमी करण्याचे ध्येय आहे.” -विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त (वाहतूक)
पुणे शहरातील अपघात
- एकूण अपघात – 978
- मृत्यू झालेले एकूण अपघात – 309
- एकूण मृत्यू – 327
- पादचारी मृत्यू – 106
- दुचाकीस्वाराचा मृत्यू -187
- कार पॅसेन्जर मृत्यू -8
- इतर मृत्यू – 26
- रात्री 11 ते 1 मध्ये मृत्यू – 75