खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांचा शड्डू
पुणे – जे खासदार मध्यंतरी मतदारसंघात फिरत नव्हते, तेच आता निवडणुका जवळ आल्याने पदयात्रा काढत आहे. मध्यंतरी ते खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केला आहे. तसेच काळजी करू नका, त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार, निवडून आणून दाखवेल, अशा शब्दात पवार यांनी थेट अमोल कोल्हेंना आव्हान दिले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काॅंगे्रसच्या खासदार सुप्रीया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यात जाहीर सभादेखील होणार आहे, याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, यातील एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते, तर खूप बरे झाले असते. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे.
त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. त्यांचे मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हते. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितले होते की मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काढलेला एक सिनेमा चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली होती.
मी हे कधीच बोलणार नव्हतो, पण आता यांना उत्साह आला आहे. निवडणुका आता जवळ आल्या आहेत ना. त्यामुळे एक-एक पदयात्रा, कोणाला संघर्षयात्रा सुचतेय. हे चालायच, लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वांनाच पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
डॉ.कोल्हे यांना दिलेली उमेदवारी चुकली का, असे विचारले असता पवार म्हणाले की, उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगले आहे, उत्तम कलाकार आहेत, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेने खिळवून ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. पण काळजी करू नका, मी आज तुम्हाला सांगतो की, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, निवडून आणून दाखवेल.”, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.