पुणे – शहरात अवघ्या आठवडाभरातच करोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांवर पोहोचला आहे. त्यातील जवळपास 85 टक्के रुग्ण हे सौम्य अथवा लक्षणेच नसलेले आहे. तर, आतापर्यंत केवळ साडेसात टक्के बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. मात्र, हा दैनंदिन आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रूग्णांना भरती करण्याचे प्रमाण वाढल्यास टप्प्याटप्प्याने हे बेड ताब्यात घेतले जाणार आहेत. त्यानुसार, रुग्णालयांनी तयारी करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
करोनाचे नवे बाधित रोखण्यासाठी महापालिकेने कॉन्टॅक्ट्र ट्रेसिंग वाढवले असून चाचण्यांची संख्या 20 हजारांच्या घरात पोहचली आहे. तर, दैनंदिन रुग्णसंख्याही 3 हजारांच्या आसपास गेली आहे. परिणामी, रुग्णवाढीचा वेग धडकी भरवणारा आहे. पण, जवळपास 85 टक्के रुग्णांची लक्षणे अतिशय सौम्य स्वरुपाची आहेत. त्यामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अवघे 7 ते 9 टक्के आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असले तरी त्यांना बेडची गरज भासत नसल्याचे चित्र आहे. मात्र, त्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यात, पालिकेचे बंद असलेले जम्बो हॉस्पिटलचे 100 बेड सुरू करण्यासह टप्प्याटप्प्याने खासही हॉस्पिटलचे बेडही ताब्यात घेण्यात येणार आहेत.
रुग्णालयात जास्तीत जास्त आयसीयू, व्हेन्टिलेटर बेड्स उपलब्ध करून देण्यात यावेत, त्याचबरोबर रुग्णालयाच्या परिसरातील फायर यंत्रणा व इलक्ट्रिक व्यवस्थेचे ऑडिट करून सर्व यंत्रणा अद्यावत ठेवण्यात याव्यात, ऑक्सिजन निर्मिती-साठा-पुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे सुस्थित कार्यरत करण्यात यावी आणि ऑक्सिजन गळती होऊन कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आदेशही बिनवडे यांनी दिले आहेत.
सध्या शहरात नवीन येणाऱ्या रुग्णांपैकी ज्यांना गरज आहे त्यांना शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. मात्र, बहुतेक रुग्णांना लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा
सौम्य लक्षणे असणाऱ्यांना रुग्णालयाची गरज नाही?
ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे असतात यामध्ये ताप कमी न होणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा इतर काही लक्षणे असतील त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. जर ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला असे सौम्य लक्षणे असतात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही आणि ते घरच्या घरी बरे होतात, असे निरीक्षण पालिका आरोग्य विभागाने नोंदवले आहे.
शहरात 28 हजार बेड सज्ज
शहरात सध्या 28 हजार बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. यापैकी ऑक्सिजनविरहित बेड हे 18 हजार 517 आहेत. तर, ऑक्सिजनचे बेड हे 7 हजार 871 आहेत. आयसीयूचे 1 हजार 114 आणि व्हेंटिलेटरसाठी 830 असे एकूण 28 हजार 337 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर, यापैकी 11 हजार 224 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी, सध्या 590 च बेड भरलेले आहेत. म्हणजेच सज्ज असलेल्या बेडपैकी केवळ 2 टक्केच बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.