महापालिकेकडून निधी, निविदातरीही होईना दुरूस्ती
पुणे – महापालिका प्रशासनाने यावर्षी पावसाळ्यातील रस्ते दुरूस्तीसाठी निविदा काढून सर्व यंत्रणा सज्ज ठेवली. यासाठी, थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 50 कोटींचा निधी बिले देण्यासाठी ठेवला आहे. मात्र, रस्त्यांची चाळण झाली तरी महापालिकेकडून रस्त्यांची दुरूस्ती का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर, पाऊस थांबताच खड्डे दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, खड्डे दुरूस्तीसाठी क्षेत्रीय कार्यालयांनी नेमलेल्या ठेकेदारांकडे कामगार तसेच आवश्यक असलेली यंत्रणाच नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.
खड्ड्यांसाठी 50 कोटींचा निधी…
पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होणार असल्याची खात्री असल्याने महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 15 मोबाइल व्हॅनसाठी प्रत्येकी दिड कोटींच्या निविदा काढलेल्या आहेत. तर मुख्य खात्याकडून 12 मीटरच्या वरील रस्त्यांची दुरूस्ती केली जात असल्याने या कामासाठी 7 ते 8 कोटींची स्वतंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिवाय, 12 मीटरच्या आतील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे असल्याने त्यांना दुरूस्तीसाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी दिला आहे. या व्यतिरिक्त परिमंडळ 4 कोटींचा निधी देण्यात आला आहे. असा जवळपास 50 कोटींचा निधी असून यासाठीच्या निविदा तसेच वर्क ऑर्डरही देण्यात आल्या आहेत. आता, पावसाने खड्डे वाढले आहेत शिवाय, भर पावसातच ते दुरूस्त केले जात असल्याने पुन्हा-पुन्हा त्याच जागांवर खड्डे पडत आहेत.
पाऊस थांबताच दुरूस्ती करणार
शहरात सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे, सध्या मुख्य खाते तसेच पथ विभागाकडून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले जात असून पाऊस थांबताच तातडीने खड्डे दुरूस्तीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरात सध्या केवळ वाहतूक कोंडी आणि तातडीची बाब असलेल्या ठिकाणीच रस्ते दुरूस्ती केली जात आहे. तसेच, पालिकेचा हॉटमिक्स प्लांटही तयार असून या ठिकाणी दिवसाला 450 टन हॉटमिक्स तयार करून क्षेत्रीय कार्यालयांना मागणीनुसार, दररोज 150 टन मुख्य खात्याच्या माध्यमातून 300 टन माल देऊन रस्ते दुरूस्त केले जाणार असल्याचा दावा पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला आहे.