पुणे – ज्या निवासी मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली, अशांना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून “पीटी-3′ अर्ज भरून घेतला जात आहे. हे अर्ज भरण्यासाठी महापालिकेकडून वाढविण्यात आलेली मुदत येत्या गुरूवारी दि.३० रोजी संपत आहे.
मिळकत करातील ४० टक्के सवलत रद्द झालेल्या नागरिकांनी या अर्जासोबत महापालिकेने निश्चित करून दिलेल्या कोणत्याही दोन कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर न केल्यास ४० टक्के सवलत कायमची संपुष्टात येणार आहे. दरम्यान, ४० टक्के सलवत रद्द न मिळालेल्या तसेच सवलत रद्द झालेल्या सुमारे तीन लाख मिळकती शहरात असून पालिकेकडे सुमारे एक लाखाच्या आसपास पीटी-३ अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेने आधी ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली होती. मात्र, अनेक मिळकतधारकांना दिवाळीच्या गडबडीमुळे अर्जच करता आले नाहीत. त्यामुळे अर्जासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे.
काय आहे सवलत प्रकरण
महापालिकेने २०१९ पासून सर्व नवीन निवासी मिळकतींची कर सवलत रद्द केलेली आहे. त्यामुळे ते १०० टक्के कर भरत होते, त्याच प्रमाणे पालिकेने शहरात तपासणी केल्यानंतर ज्या निवासी मिळकतींचा वापर व्यावसायिक केला जात आहे अथवा जेथे भाडेकरू राहत आहेत, अशा मिळकतींना मागील तीन वर्षांच्या थकबाकीसह, ४० टक्के सवलत रद्द करून लाखभर रुपयांच्या थकबाकींची बिले पाठविली आहेत.
शासनाने ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेने या मिळकतींना ६० टक्के बिले दिली आहेत तसेच या मिळकतींचा पीटी-३ अर्ज आल्यानंतर त्यांची थकबाकी माफ होणार आहे. तसेच ज्यांचे अर्ज येणार नाहीत. त्यांच्या दुसर्या सहामाहीच्या बिलात ही रक्कम वाढविली जाणार असून ४० टक्के रकमेवर दंडही आकारला जाणार आहे.