पुणे –करोनामुळे पावणेदोन वर्षे बंद असलेल्या पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवार (दि.16) पासून सुरू होणार आहेत. यामुळे शाळांमध्ये आता पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहण्यास मिळणार आहे. शाळांकडूनही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
2021-22 हे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले. मात्र, करोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंदच ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले होते. शाळा कधी सुरू होणार याचे वेध विद्यार्थ्यांना लागले होते. राज्य शासनाने शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंटचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने बहुसंख्य जिल्ह्यातील प्रामुख्याने शहरी भागातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, पुणे महापालिकेने करोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेऊन आता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाबाबतच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. शाळा पसिरात स्वच्छता करण्यात आली असून सॅनिटायझिंगही करण्यात आले आहे. वर्गांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून रांगोळ्याही काढण्याची तयारी करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे ओक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट व इतर आकर्षक वस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्याचे शाळांचे नियोजन आहे. शाळांनी पालक, विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन बैठका घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. पालकांचे संमतीपत्रही बंधनकारक केले आहे.
पहिली ते चौथीच्या आश्रमशाळा सुरू
पुणे, दि. 15 -राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गतच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी शाळापासून शाळा बंद असून ऑनलाइनसह इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले दीड वर्षापासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक तणाव येऊन दुष्परिणाम होत असल्याचे आढळून आले.
जास्त काळ शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसान भरून काढणे कठीण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. प्रकल्प कार्यालयस्तरीय समितीने व शाळा ज्या गावात आहे तेथील ग्रामपंचायत यांनी ठराव करून निकषांच्या आधारे 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती.