खटल्यासाठी हवेत सरकारी वकील उमेशचंद्र यादव

शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड प्रकरणी शिवसैनिकांचे खासदार संजय राऊत यांना साकडे

नगर – महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून  केडगावमध्ये 7 एप्रिल 2018 रोजी दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरमधील पदाधिकार्‍यांनी शिवसेना पक्षाचे  नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या खटल्यातील संशयित मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर या गुन्हा घडल्यापासून अजुनही पसार आहेत. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही या पदाधिकार्‍यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक योगिराज गाडे, दत्ता जाधव, दत्ता खैरे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका पोट निवडणुकीच्या वादातून झालेल्या या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. तथापि, यातील संशयित आरोपी सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर अद्याप पसार आहेत. त्यांना अटकपूर्व जामीनही नाकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करुन शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्यासमोर मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.