मोठी बातमी! नक्षलवाद्यांशी लढताना पाच जवान शहीद; 21 जण अजूनही बेपत्ता

हल्ल्यात सुरक्षा रक्षकांचे 12 जवान जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा या नक्षलवादी प्रभावित जिल्ह्यामध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले. तर 21 जवान अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील नक्षलवादी विरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक ओपी पाल यांनी ही माहिती दिली.

नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांचे 12 जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं.

या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर दु:ख व्यक्त करत या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे सांगितले. त्यानी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे की, “माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.