वडूज – सातेवाडी, ता. खटाव येथील उमेश दादासाहेब बोटे यांच्या शेतातील उसाला काल (दि. 7) शॉर्टसर्किटने आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील उसाला गुरुवारी दुपारच्या वेळेत शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत पाऊण एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. शेजारच्या फळबागेसही आगीची झळ लागली. महावितरण कंपनीने बाधित शेतकऱ्यास तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
सातारा – लॉकडाउनच्या काळात शालेय विद्यार्थ्यांकडून रोजच्या रोज घरबसल्या अभ्यास करून घेतानाच करोनाविषयी जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम पुसेगावच्या श्री सेवागिरी विद्यालयाने सुरू केला आहे. ऑनलाइन अभ्यासासोबत करोनाविषयी रोज विद्यार्थ्यांना निर्देश देणारी ग्रामीण भागातील ही एकमेव शाळा आहे.
लॉकडाउनमुळे सध्या शाळा बंद आहेत. बहुतेक शाळा विविध ऍप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजचा अभ्यास देत आहेत. सेवागिरी विद्यालयाच्या शिक्षकांनी यात आघाडी घेतली असून नियमितपणे होणाऱ्या व्हर्चुअल क्लासेसच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे. करोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे, यासाठी जनजागृती होण्यासाठी मुख्याध्यापिका संध्या चौगुले 750 विद्यार्थ्यांशी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून रोज संपर्कात राहतात. करोनाबाबत काळजी घेण्याविषयी सूचना त्या देतात.
“करोनाचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊननंतरच्या पहिल्या दिवसापासून शाळेकडून मुलांमध्ये जागृती निर्माण केली. मुलांच्या वयाचा, मानसिकतेचा विचार करून व्हॉट्सऍपवर सातत्याने मेसेज लिहून पालकांच्या ग्रुपवर पाठवले जातात. वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी गप्पा मारते. ते पाहून मुलांमधील सकारात्मक बदल पालकांकडून आवर्जून कळवले जातात,” असे संध्या चौगुले यांनी सांगितले. या काळात मुलांना घरात गुंतवून ठेवण्यासाठी अनेक बौद्धिक खेळ, कोडी सोडवणे, शब्दसंग्रह वाढवणे, अवांतर वाचन, करोनाविषयी चित्रकला, सेल्फी, कोविड 19 विषयी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू घडामोडी, ई लर्निंग, ई- पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, विविध शैक्षणिक लिंक या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकही सातत्याने पालकांच्या ऑनलाइन संपर्कात राहतात. शिष्यवृत्ती व इतर परीक्षांची ऑनलाइन तयारी सुरू झाली आहे. नियोजनपूर्वक दहावीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे, असी माहिती त्यांनी दिली. या ऑनलाइन वर्गात शाळेतील 88 टक्के विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक फोन करून अभ्यासाविषयी मार्गदर्शन करतात. यावर्षी नेहमीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया होऊ शकणार नव्हती. त्यामुळे शिक्षकांनी फोनवरुन ग्रामीण भागातील पालकांना गुगल लिंकद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने या शाळेत 70 हून अधिक प्रवेश झाले आहेत.