कराड – गुरूवारी शहरात करोनाबाधित महिला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने रूग्णवाहिका शोधण्यासाठी धावाधाव केली. मात्र, तरीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी ती महिला चालत रूग्णालयाकडे गेली. या प्रकाराने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
शुक्रवारी येथील शिवराज ढाबाचे मालक पोपटराव साळुंखे व नामदेव थोरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपली रूग्णवाहिका नगरपालिकेकडे सुपूर्द केली. तर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या दोन मिनी बसेस ताब्यात घेतल्या आहेत. यासह इतर एक अशा एकूण चार ऍम्ब्युलन्स करोनाचे संकट संपेपर्यंत पालिकेच्या ताब्यात राहणार आहेत.
गुरूवारी मंगळवार पेठेत एका 65 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी तेथे पोहोचले. 108 क्रमांकाला फोन करण्यात आला. मात्र रूग्णवाहिका मिळाली नाही. अन्यत्रही फोन करण्यात आले. मात्र, गाडी मिळाली नाही. शेवटी ती महिला चालतच रूग्णालयात गेली. हा प्रकार पालिकेने गंभीरपणे घेतला. त्यानंतर एखादी रूग्णवाहिका पालिकेनेच खरेदी करावी, असे नगरसेवकांनी सुचवले. मात्र मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगरपरिषद शाळा क्रमांक तीनच्या दोन मिनी बसेस ताब्यात घेऊन त्या मॉडीफाय करण्याचे जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी या बसेस मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पालिकेत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना सुपूर्द केल्या.
अख्खा मसूर स्पेशल शिवराज ढाबा स्पेशल यांच्यावतीने चालवली जाणारी रुग्णवाहिकाही नगरपालिकेस सुपूर्द करण्यात आली. पोपटराव साळुंखे यांनी या रुग्णवाहिकेच्या चाव्या मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना प्रदान केल्या.
यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, जयंत बेडेकर, नवाज सुतार उपस्थित होते.
सध्याच्या संकटात पालिकेकडे रूग्णवाहिका असणे गरजेचे आहे. गुरूवारी जो प्रकार घडला तो चिंतेचा आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पालिकेकडे रूग्णवाहिका असणे आवश्यक असल्याची बाब नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी समोर मांडली. जान फौंडेशनचे जावेद नायकवडी यांनी एखादी जुनी ऍम्ब्युलन्स मिळाल्यास जान फौंडेशनतर्फे खरेदी करून ती सर्वसामान्यांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी मुख्याधिकारी डांगे यांनी नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या मिनी बसेस ताब्यात घेतल्या. त्याला मॉडीफाय करून वापर केला जाणार आहे.