राजगुरूनगर -“राजगुरूनगर सहकारी बॅंकेने मोबाइल एटीएम सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी’ असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या राजगुरूनगर येथील टिळक चौक शाखेच्या स्ववास्तूचे उद्घाटन, त्यातील बॅंकेचा शुभारंभ व हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, बॅंकेचे संस्थापक कै. दादासाहेब आपटे यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी भूषवले.
यावेळी सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, उपाध्यक्ष अरुण थिगळे, ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, मुकुंद आवटे, डी. के. गोरे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, किरण मांजरे, धनंजय कहाणे, राहुल तांबे, दिनेश ओसवाल, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, सागर पाटोळे, धमेंद्र खांडरे, किसान गारगोटे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांच्यासह बॅंकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह 50 निवडक व्यक्ती उपस्थित होत्या. सोशल डिस्टन्स ठेवून व सॅनिटायझरचा वापर करून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
आमदार मोहिते म्हणाले, अनेक सहकारी बॅंका डबघाईला आल्या असताना राजगुरूनगर सहकारी बॅंकेची प्रगती राज्यात पुढे आहे. चांगले संचालक मंडळ आणि अधिकारी वर्ग असल्यास बॅंकांची प्रगती होते. त्यातही अध्यक्ष चांगला लाभल्याने बॅंकेची प्रगती मोठी आहे. राजगुरूनगर सहकारी बॅंकेत कोणतेही राजकारण नाही. बॅंक पक्ष विरहित राहावी, त्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विनायक घुमटकर म्हणाले, ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थांचा विचार करणे महत्वाचे आहे. गेली तीन महिने करोना विषाणू संसर्गामुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत राजगुरुनगर सहकारी बॅंकेने आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बॅंकेचे अध्यक्ष, अधिकारी वर्ग आणि सांचालक मंडळाची भूमिका यातही महत्वाची ठरली आहे. सभासदांचे रक्षण करणे ही अध्यक्ष, विश्वस्तांची जबाबदारी आहे. ती त्यांनी यशस्वी निभावल्याने बॅंकेची प्रगती झाली आहे. सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी केले उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी आभार मानले.
आर्थिक संकट असतानाही बॅंकेने उच्चांकी कर्ज वसुली केली आहे. सर्व संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांमुळे हे शक्य झाले. बॅंकेचे हित जोपासण्यासाठी बॅंकेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी काम केले. त्यामुळे बॅंकेला न्याय देता आला. बॅंकेच्या थकीत कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी अध्यक्षपद सोडले नाही. पदाची हाव नव्हती; मात्र बॅंकेचे हित समोर ठेवून काम केले. मात्र, यापुढे आपण दुसऱ्या सहकारी संचालकाला अध्यक्षपदाची संधी देणार आहोत.
-गणेश थिगळे, अध्यक्ष राजगुरूनगर सहकारी बॅंक