Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबा आणि वडीलांनाही अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाबाबत सातत्याने नवे खुलासे होत आहेत. यातच आता कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली आहे. Pune Porsche Car Accident |
ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ललीत पाटील प्रकरणातून ससून प्रशासनाने अद्यापही धडा घेतला नसल्याचे यातून दिसून येते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होवू लागले आहेत. Pune Porsche Car Accident |