पुणे – महापालिकेच्या माध्यमातून पुणेकरांच्या सेवेत आयुष्य झिजविलेल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनानतर मिळणाऱ्या हक्काच्या निधीसाठी आपल्याच कार्यालयात लाच द्यावी लागत आहे. महापालिकेत मागील आठवड्यात सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रजांचे पैसे देण्यासाठी लाच मागणाऱ्या बील क्लार्कला लाचलूचपत विभागाने अटक केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आता पेन्शन प्रकरणे मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. महापालिकेकडे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुमारे 444 प्रकरणे प्रलंबित आहेत. “प्रभात’ने या कारवाईनंतर हा विषय प्रकर्षाने मांडला होता.
महापालिकेत अनेक वर्ष सेवा बजाविल्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळविण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता आदी सोपस्कार पार पाडावे लागत आहे. प्रत्यक्षात हे काम कर्मचारी सेवा निवृत होण्यापूर्वी एक वर्षे आधीच ही प्रक्रीया सुरू करणे अपेक्षित असताना प्रशासन अनेकदा एक-दोन महिने आधी हे काम हाती घेते. परिणामी, हे सोपस्कार पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. यातून त्रस्त निवृत्त कर्मचाऱ्यांकडे बील क्लार्क इतर कर्मचारी पैशाची मागणी करतात. यातूनच मागील आठवड्यात लाच लूचपत विभागाने महापालिकेत कारवाई केली आहे.
कर्मचारी ज्या महिन्यात निवृत्त होतो, त्याच महिन्यात भविष्य निर्वाह निधी, थकीत रजेचे पैसे मिळाले पाहिजेत तर दुसऱ्या महिन्यापासून त्याला पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली पाहिजे. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासकीय कामांना सुरुवात केली जाते. संबंधित कर्मचारी सेवेत कधी रुजू झाला, सेवा काळात त्याला मिळालेली पदोन्नती, त्याची सेवा पुस्तिका तपासणी आदी कामे करावी लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी हा स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार आहे, असे मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.