वडगाव मावळ – आंबळे येथे होणाऱ्या पूर्वनियोजित वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या वतीने सेमीकंडक्टर प्रकल्प मावळात उभारण्यात येणार होता. परंतु हा प्रकल्प मावळातून रद्द करून गुजरातला नेला आहे. त्याच्या निषेधार्थ मावळातील भूमीपुत्रांनी व युवासेनेच्या वतीने बुधवारी (दि. 14) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच हा प्रकल्प पुन्हा आहे त्याच ठिकाणी व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी शैला खंडागळे, भारत ठाकूर, अनिकेत घुले, सुरेश गायकवाड, रमेश जाधव, अमित कुंभार, आशिष ठोंबरे, संतोष येवले, विशाल दांगट, राजेश पळसकर, राम सावंत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी युवासेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने तैवान येथील वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीसोबत वाटाघाटी झाली.
त्यात 1 लाख 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणारा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी येथे व्हावा, यासाठी युवासेना प्रमुख तत्कालीन पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यशस्वी प्रयत्न केले होते.
या प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील व महाराष्ट्रातील 1 लाख युवकांसाठी रोजगार उपलब्ध होणार होता. परंतु नुकतेच महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिंदे -फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. काल हा प्रकल्प गुजरातला हालविण्यात आल्याचे पुढे आले आहे. या निर्णयामुळे मावळ तालुक्याचा औद्योगिक व सर्वांगीन विकासाला खिळ बसणार आहे. एवढ्या मोठ्या रोजगाराच्या संधीपासून मावळ व महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांना वंचित ठेवण्याचे पाप या सरकारकडून झाले आहे. म्हणून आज आम्ही मावळ तालुक्यातील भूमीपुत्र तरुण व युवासेनेच्या वतीने या गुजरात धारर्जिन्या सरकारचा निषेध करतो.