सातारा (प्रतिनिधी) – सातारा नगरपालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव, गणेश टोपे यांच्या लाचलुचपतीच्या प्रकरणाने पालिकेच्या आरोग्य विभागाची बदनामी झाली आहे. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सदस्य असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रविवारी काळ्या फिती लावून काम केले.
करोनाच्या संकटात पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “स्वच्छ भारत’ अभियानात पालिकेला नामांकन मिळवून दिले आहे. करोनाच्या महाभयंकर संकटात अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे; परंतु अधिकारी भ्रष्टाचार करण्यात मग्न आहेत, हा शहरावरील कलंक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी या भ्रष्ट प्रवृत्तीचा संघटितरित्या निषेध केला.
करोनाच्या संकटकाळात शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही काम करत आहोत; परंतु काळ्या फिती लावून भ्रष्टाचाऱ्यांचा निषेध करत आहोत. नागरिकांनीही त्यांच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आंदोलनास भाग घेतला पाहिजे, असे मत अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचे सचिव सागर गाडे यांनी सांगितले.