पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात आता प्रत्येक 15 दिवसांनंतर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) बदलणार आहेत. शहरात लॉकडाऊन शिथिल होत असताना, आता करोनाबाधित शहराच्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सापडत असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. त्यानुसार, सोमवारी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
शहरात 1 जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्यानुसार तीन टप्प्यांत 8 जूनपर्यंत शहरात सुमारे 85 टक्के व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात वर्दळ वाढली आहे.
परिणामी, 14 जूनपर्यंत नवीन करोना बाधितांची संख्या स्थिर असली, तरी 49 टक्के बाधित कंटेन्मेंट झोनबाहेरचे आहेत. त्यामुळे हे भाग सील करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी आयुक्तांनी संबंधित यंत्रणांची बैठक बोलवली आहे. त्यात, नवीन बाधित सापडलेले भाग तसेच बाधित कमी झालेल्या भागांचा तुलनात्मक अभ्यास करून नवीन कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जाणार आहेत.
15 दिवसांनी आढावा घेणार
पहिले चार लॉकडाऊन 15 ते 21 दिवसांचे होते. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरच आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येत होते. मात्र, आता पाचवे लॉकडाऊन दि.30 जूनपर्यंत आहे. त्यामुळे नवीन प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतला न गेल्यास शहराच्या इतर भागात करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे यापुढे प्रत्येक 15 दिवसांनी बाधितांच्या संख्येचा आढावा घेऊन नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली जाणार आहेत.