माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश पुणे पोलिसांनी न्यायालयाकडून प्राप्त करुन घेतले आहेत. बऱ्हाटे विरुध्द पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. यानंतरही तो मिळून आलेला नाही. यानंतर न्यायालयाने 3 नोव्हेंबर रोजी जाहीरनाम्याचा आदेश काढून तो पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनीक ठिकाणी प्रसिध्द केला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह 13 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानूसार (मोक्का) कारवाई केली आहे.

हडपसर येथील गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे टोळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्हयासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात 7 जुलै 2020 रोजी दाखल झाला होता. बांधकाम व्यवसायीकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली होती.

त्यानंतर 12 जुलै रोजी समर्थ पोलीस ठाण्यातही एका बांधकाम व्यवसायीकाला धमकावून त्याच्याकडून 72 लाख रुपये घेऊन आणखी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर तिसरा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला.

त्यामध्ये कोथरुड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची तीस लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरींग व्यवसायीकाने दाखल केल्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.