पुणे : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश विक्रीस मनाई केली आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत.
शासनाने शैक्षणिक वर्ष सुरू केले असले तरी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. दरम्यान, काही शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करून पुस्तके विक्री सुरू असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर यांनी लेखी तक्रार नोंदविली होती. त्याची दखल घेत डॉ. मोरे यांनी शाळांना आदेश जारी केले आहेत.
सध्या शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ई-साहित्यही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये कोणतेही साहित्य खरेदी करण्यासाठी जाणे धोकादायक होऊ शकते. पुस्तक, गणवेश व इतर साहित्य विक्रेत्यांबरोबर शाळांनी टायअप केलेले असते. ठराविक विक्रेत्यांकडूनचं साहित्य खरेदी करण्याचे बंधन शाळांकडून घालण्यात येत असते. यंदाही ही परंपरा कायम आहे.
साहित्य विक्रेत्यांनी थेट शाळांमध्येचं दुकाने मांडली आहेत. यामुळे पालकांची शाळांमध्ये गर्दी होत आहे. काही शाळांनी विक्रेत्यांच्या दुकानावर जाऊन साहित्य खरेदीच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ठराविक दुकानांसमोरही गर्दी वाढत आहे. शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शनाचा वापर करून योग्य ती कार्यवाही करावी.