चेन्नई: उत्तरार्धातील चतुरस्त्र खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने पाटणा पायरेट्स या माजी विजेत्या संघास 35-26 असा पराभवाचा दणका दिला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये अनपेक्षित विजयाची नोंद केली.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्यंतराला बंगालकडे 15-14 अशी केवळ एक गुणाची आघाडी होती. त्यावेळी हा सामना शेवटपर्यंत रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र बंगालच्या खेळाडूंनी नियोजनबद्ध खेळ करीत वरचष्मा गाजविला. पाटणाच्या खेळाडूंनी तीन मोसमात विजेतेपद मिळविले असले तरी त्या दर्जाच्या मागमूसही त्यांच्या खेळात दिसून आला नाही.
दोन्ही संघांमध्ये पूर्वार्धात चुरस दिसून आली. तथापि उत्तरार्धात पहिल्याच मिनिटाला बंगालच्या खेळाडूंनी पहिला लोण नोंदवित 19-14 अशी आघाडी घेतली. तेथून त्यांनी मागे पाहिलेच नाही. सामन्याची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने आणखी एक लोण स्वीकारला. बंगालच्या विजयात मनिंदरसिंगने 10 गुण घेत सुपरटेनची कामगिरी केली. के. प्रपांजन व रिंकू नरवाल यांनीही संघाच्या विजयास हातभार लावला. पाटणा संघाच्या परदीप नरवालने 12 गुण मिळविले. त्याचा अपवाद वगळता पाटणाच्या अन्य खेळाडूंनी अपेक्षाभंग केला.
चाहत्यांची निराशा
पाटणा पायरेट्सने तीन वेळा या स्पर्धेवर आपली मोहोर नोंदविली असल्यामुळे त्यांचे भरपूर चाहते आहेत. येथेही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. मात्र पाटणाच्या भरवशाच्या खेळाडूंनी खूप चुका करीत त्यांची निराशा केली.