“द कॅमडेन काऊन्सिल’ या स्थानिक महापालिकेने घेतला निर्णय
लंडन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे रुपांतर संग्रहालयात केले आहे. मात्र, आता हे संग्रहालय बंद करण्याचा निर्णय लंडनच्या “द कॅमडेन काऊन्सिल’ या स्थानिक महापालिकेने घेतला आहे.
“द कॅमडेन काऊन्सिल’ने आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, शांतता झोनमध्ये असलेल्या या ऐतिहासिक घराचे संग्रहालयात रुपांतर झाल्यापासून येथे भेट देणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांच्या गर्दीचा त्रास या घराच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना होत असून तशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे 2050 चौफूट जागेत असलेल्या या चार मजली घराचे पुन्हा रहिवासी जागेत रुपांतर झाले पाहिजे, म्हणजेच येथील संग्रहालय दुसरीकडे हलवण्यात यावे. अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे.
राज्य सरकारने काऊन्सिलच्या या निर्णयाविरोधात स्थानिक कोर्टात धाव घेतली आहे. सिंघानिया आणि कंपनी ही कायदाविषयक संस्था शासनाची बाजून कोर्टात मांडणार आहे. या प्रकरणावर 24 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.