गुजरातपुढे पाटणाचे आव्हान
चेन्नई: नाव मोठे पण लक्षण खोटे अशीच काहीशी अवस्था तमिळ थलाईवाज संघाची झाली आहे. त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबा संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. अद्याप अपेक्षेइतका सूर न सापडलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट्सला माजी विजेत्या पाटणा पायरेट्सविरूद्ध सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे.
थलाईवाज संघाकडे अजय ठाकूर, राहुल चौधरी, शब्बीर बापू, मनजित चिल्ल्रर आदी मातब्बर खेळाडूंचा ताफा असला तरी त्यांची एकत्रित प्रभावी कामगिरी झालेली नाही. त्यामुळेच त्यांना आतापर्यंत झालेल्या 9 लढतींपैकी तीनच सामने जिंकता आलेले आहेत. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आवश्यक असणारा आक्रमक खेळ करण्यात त्यांचा कमकुवतपणा दिसून आला आहे. मुंबा संघालाही अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. त्यांनी 9 लढतींपैकी चारच लढतींमध्ये विजय मिळविला आहे. त्यांनाही पकडी व चढायांमध्ये भरपूर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
पाटणा संघाने आतापर्यंत तीन मोसमात विजेतेपद घेतले असले तरी यंदा त्यांच्या खेळाडूंनी निराशा केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या यांग कुनली याच्यासह परदेशी खेळाडूंना चमकदार खेळ करता आलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या खेळात अपेक्षेइतका आक्रमक खेळही दिसून आलेला नाही. गुजरातने स्पर्धेतील पदार्पणातच अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली असली तरी यंदा त्यांचा खेळ प्रभावी झालेला नाही. त्यांना चढाया व पकडींवर योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.
स्थळ-चेन्नई
वेळ रात्री 7.30 वा.
गुजरात फॉर्च्युनजाएंट्स वि. पाटणा पायरेट्स
वेळ रात्री 8.30 वा.
तमिळ थलाईवाज वि. यु मुंबा
गुजरात फॉर्च्युनजाएंट्स
बलस्थाने-आक्रमक खेळाडूंची मांदियाळी
भक्कम आत्मविश्वास लाभलेले खेळाडू
कच्चे दुवे
खेळावर नियंत्रणाचा अभाव
शेवटच्या क्षणी घिसडघाई
पाटणा पायरेट्स
बलस्थाने- तीन वेळा विजेता असलेला संघ
खोलवर चढाया करण्यात माहीर
कच्चे दुवे
सांघिक खेळाचा अभाव
शेवटच्या टप्प्यात अतिघाईमुळे होणाऱ्या चुका
तमिळ थलाईवाज
बलस्थाने- अनुभवी खेळाडूंचा ताफा
पल्लेदार चढाया करण्याबाबत माहीर
कच्चे दुवे
फाजील आत्मविश्वासामुळे अक्षम्य चुका
खेळावर नियंत्रणाचा अभाव
यु मुंबा
बलस्थाने-भक्कम पकडी करण्यावर हुकुमत
सांघिक कामगिरीवर भर
कच्चे दुवे
चढायांमध्ये नकळत होणाऱ्या चुका
महत्त्वाच्या क्षणी नियंत्रणाचा अभाव