देशातील तब्बल 150 रेल्वेगाड्यांचे होणार खासगीकरण ?

सरकारकडून खासगीकरणाची प्रक्रिया गतिमान

नवी दिल्ली : देशात नुकतेच पहिल्यावहिल्या खासगी स्वरुपाच्या तेजस एक्‍स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर आता केंद्र सरकारने आणखी काही रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानके खासगी कंपन्यांकडे देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवला आहे. सरकारने देशातील तब्बल 150 रेल्वेगाड्या आणि 50 स्थानके यांची जबाबदारी खासगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी सुरू केली आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याशी या संदर्भात सल्लामसलत करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 150 रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांच्या हातात देण्यात येणार आहेत. यासाठी सचिव स्तरावरील एक उच्चाधिकार समितीही तयार करण्यात येईल. या समितीमध्ये नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, अर्थ खात्याचे सचिव, नगरविकास विभागाचे सचिव यांचा समावेश असणार आहे.

तेजस एक्‍स्प्रेस 4 ऑक्‍टोबरपासून नियमितपणे रेल्वेरुळांवरून धावण्यास सुरुवात झाली. लखनऊ ते दिल्ली हे अंतर ही रेल्वे सहा तास 15 मिनिटांत कापते. या मार्गावर फक्त कानपूर आणि गाझियाबाद या दोनच ठिकाणी ही रेल्वे थांबते. पूर्णपणे आयआरसीटीसीकडून चालविण्यात येणारी भारतीय रेल्वेची ही पहिलीच गाडी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.