कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपण केलेल्या आवाहनाला सर्व खासगी डॉक्टरांनी फोनच्या माध्यमातून व कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून करोनाच्या संकटात गरजू रुग्णांना सेवा देवून केलेले सहकार्य अनमोल आहे. यापुढेही खासगी डॉक्टरांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी खासगी डॉक्टरांच्या बैठकीत केले.
आ. काळे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जगाला गुडघे टेकायला लावणाऱ्या करोना व्हायरसच्या जीवघेण्या विषाणूमुळे रुग्णांना आरोग्यसेवा कशी द्यावी, या विवंचनेत खासगी डॉक्टर पडले होते. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शहरातील डॉक्टरांना फोनच्या माध्यमातून सेवा देण्याचे आवाहन केले होते. त्यास सर्वच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. तसेच सर्दी, खोकला, ताप अशा आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार केले. शहरात करोनाबाधित व सारी सदृश आजाराने बाधित महिला आढळून देखील आपण करोनावर वर्चस्व मिळविले आहे. करोनाच्या या संकटाचा समूळ नायनाट करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व खाजगी डॉक्टरांनी हे सहकार्य असेच सुरु ठेवावे.
यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. अजय गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, डॉ. दीपक पगारे, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. झिया शेख, डॉ. प्रदीप कुडके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मयूर जोर्वेकर, उपाध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे, डॉ. शेखर फडके, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. संदीप मुरूमकर, डॉ. संजय उंबरकर, डॉ. नारायण आव्हाड, डॉ. शांताराम आढाव, डॉ. विलास आचारी, डॉ. ढाकणे उपस्थित होते.