सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष व सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा करोनाबाधितांच्या निकट सहवासातील तीन जणांचा अहवाल करोना पाँझिटिव्ह (कोविड-१९) आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ९५ झाली आहे.
23 जणांचे अहवाल निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाती १, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील १ व फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील १० अशा एकूण २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
130 जण विलगीकरण कक्षात दाखल
6 मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १०२, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात २१ अशा एकूण १३० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात ७९ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. १४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. दोन रुग्णांचा म्रुत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या ९५ इतकी आहे.