सातारा: छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड कोसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, राज्याच्या विधानसभेसोबत 21 ऑक्टोबरला सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.
आघाडीचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्यनराजेंविरोधात लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले असल्याचे बोलले जात आहे. साताऱ्याची जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे असून काँग्रेससाठी हि जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.